Skip to content
This repository has been archived by the owner on Jul 17, 2021. It is now read-only.

Latest commit

 

History

History
207 lines (165 loc) · 28.2 KB

LICENSE.md

File metadata and controls

207 lines (165 loc) · 28.2 KB

आलोक नित्यमुक्त परवाना

पहिली आवृत्ती (९ नोव्हेंबर, २०२०)

© २०२१ आलोक मराठी नियतकालिक

ह्या परवान्याची नवीनतम अधिकृत प्रत पुढील दुव्यावर उपलब्ध आहे.

https://varnamudra.com/aalok/nityamukta-parwana/

ह्या परवान्याच्या प्रतीचे वितरण मुक्त आहे, परंतु त्यात परस्पर बदल करण्याची परवानगी नाही. परवान्यातील मजकुरासंदर्भात कोणत्याही तक्रारी, सूचना अथवा सल्ले असल्यास आलोक नित्यमुक्त परवान्याच्या गिट-पृष्ठावर त्यांची नोंद करावी. गिट-पृष्ठाच्या तक्रारींचे पान पुढील दुव्यावर सापडेल.

https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana/-/issues


प्रस्तावना

आलोक नित्यमुक्त परवाना हा कोणत्याही प्रतिमुद्राधिकारप्राप्त सामग्रीचे वितरण मुक्तपणे करण्यासाठी लिहिण्यात आलेला एक परवाना आहे. ह्या परवान्यासह वितरित होणाऱ्या सामग्रीची प्रतिमुद्रा करण्याचा व ती व्यावसायिक अथवा अव्यावसायिक, परिवर्तित अथवा यथामूल स्वरूपात वितरित करण्याचा अधिकार प्रतधारकास प्राप्त होतो, परंतु ह्या परवान्यासह वितरित होणाऱ्या सामग्रीवर आधारित अशी सामग्री अथवा मूळ सामग्रीत बदल करून निर्माण केलेली सामग्री वितरित करायची असेल, तर ती ह्या परवान्यातील सर्व अटींसह वितरित करणे सक्तीचे असते.


तांत्रिक शब्द व त्यांचे अर्थ

  • सामग्री - ह्या परवान्यात वापरला गेलेला सामग्री हा शब्द प्रतिमुद्राधिकार लागू असलेल्या कोणत्याही सामग्रीला उद्देशून येतो.

  • प्रतिमुद्रा - एखाद्या सामग्रीची नक्कल म्हणजे तिची प्रतिमुद्रा. उदा. एखाद्या कागदाची छायाप्रत अथवा त्याचे काढलेले छायाचित्र ही मूळ कागदी प्रतीची प्रतिमुद्रा होय.

  • प्रतिमुद्राधिकार - कोणत्याही सामग्रीची निर्मिती करणाऱ्या व्यक्ती/संस्थेकडे त्या सामग्रीचे प्रतिमुद्राधिकार असतात. प्रतिमुद्राधिकार कायद्याद्वारे पुढील हक्क प्रतिमुद्राधिकारधारकास प्राप्त होतात.

    • प्रतिमुद्राधिकारप्राप्त सामग्रीची निर्मिती प्रतिमुद्राधिकारधारकानेच केली आहे हे वैधानिकरित्या सिद्ध करण्याचा हक्क.
    • प्रतिमुद्राधिकारप्राप्त सामग्रीची पुनर्निर्मिती करण्याचा हक्क.
    • प्रतिमुद्राधिकारप्राप्त सामग्रीच्या प्रतींचे वितरण करण्याचा हक्क.

    संदर्भ - http://www.legalserviceindia.com/article/l195-Copyright-Law-in-India.html

  • मुक्त परवाना - प्रतिमुद्राधिकारधारकास मिळणाऱ्या (वर निर्दिष्ट केलेल्या) तीन हक्कांपैकी पहिल्या हक्काचे संरक्षण व उर्वरित दोन हक्क प्रत्येक प्रतधारकास प्रदान करणे मुक्त परवान्यांद्वारे साधले जाते. मुक्त परवान्यासह वितरित झालेल्या सामग्रीची परिवर्तित अथवा यथामूल पुनर्निर्मिती व तिचे व्यावसायिक अथवा अव्यावसायिक वितरण प्रत प्राप्त झालेली कोणतीही व्यक्ती करू शकते. काही महत्त्वाचे मुद्दे.

    • मुक्त परवान्यासह प्रतिमुद्राधिकारातील पहिल्या हक्काचे पूर्ण संरक्षण होते. सामग्रीच्या निर्मात्या/निर्मातीखेरीज अन्य कोणीच वैधानिकरित्या सामग्रीच्या निर्मितीचा दावा करू शकत नाही, परंतु मूळ मुक्त सामग्रीत बदल केला गेला असेल, तर मात्र बदल करणाऱ्याने/करणारीने बदल समाविष्ट असलेल्या नव्या संपूर्ण सामग्रीचा प्रतिमुद्राधिकार स्वतःकडे घेऊन मूळ सामग्रीच्या निर्मात्या/निर्मातीचा श्रेयनिर्देश करणे बंधनकारक असते.
    • मुक्त परवान्यासह वितरित होणाऱ्या सामग्रीवर प्रतिमुद्राधिकारधारक तसेच अन्य प्रतधारक शुल्क आकारू शकतात.
    • ज्या सामग्रीत परिवर्तन करण्याचा अधिकार प्रतधारकास आहे, त्याच सामग्रीस मुक्त म्हणता येते.
    • ज्या सामग्रीचे व्यावसायिक वितरण करण्याचा अधिकार प्रतधारकास आहे, त्याच सामग्रीस मुक्त म्हणता येते.
    • मुक्त परवान्यासह वितरित झालेल्या सामग्रीची प्रत एखाद्या व्यक्तीकडे असेल, तरी तिचे वितरण करण्यासाठी कोणीही त्या व्यक्तीवर बळजबरी करू शकत नाही. मुक्त असलेल्या सामग्रीचे वितरण न करण्याचा अधिकारही प्रतधारकाकडे आहे.
    • मुक्त सामग्रीवर आधारित अथवा मुक्त सामग्रीत बदल करून तयार केलेली सामग्री अमुक्त असू शकते. मुक्ततेची अट असलेल्या परवान्यांचा एक उपवर्ग आहे, त्याबद्दल आता जाणून घेऊ.
  • नित्यमुक्त परवाना - हा मुक्त परवान्यांचाच एक उपवर्ग आहे. ह्या परवान्यांसह वितरित होणारी सामग्री सदैव मुक्त असते. तिच्या परिवर्तित स्वरूपाचे वितरणदेखील अमुक्त अटींसह करता येऊ शकत नाही. नित्यमुक्त सामग्रीवर आधारित अथवा नित्यमुक्त सामग्रीत बदल करून तयार केलेली सामग्री एका नित्यमुक्त परवान्यासह वितरित करण्याचे बंधन प्रतधारकास पाळावे लागते. तसे न केल्यास तो परवान्याचा भंग ठरतो व त्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. आलोक हा एक नित्यमुक्त परवाना आहे.

  • अनुरूप परवाना - एखाद्या पुनर्निर्मित अथवा परिवर्तित सामग्रीस आलोकव्यतिरिक्त जे अन्य परवाने चालू शकतात, त्या परवान्यांस अनुरूप परवाने असे म्हटले जाते. अननुरूप परवान्यांसह पुनर्वितरण केल्याचे आढळल्यास त्या सामग्रीचा परवाना अवैध ठरवण्याचे अधिकार आलोक नियतकालिकाकडे आहेत.

  • परिवर्तन/बदल - मूळ सामग्रीत कोणत्याही प्रकारची भर घालणे, घट करणे, तिचा अनुवाद करणे व इतर लहानात लहान भेद हे परिवर्तन म्हणून मोजले जातील. मिळालेली प्रतिमुद्रा यथामूल वितरित न करता तिच्यात केलेला कुठलाही बदल मूळ सामग्रीचे परिवर्तन म्हणून पाहिला जाईल. परिवर्तित सामग्रीचे प्रतिमुद्राधिकार बदल करणाऱ्या/करणारीने स्वतःकडे घेणे नित्यमुक्त परवान्यांमध्ये आवश्यक ठरते. असे करताना मूळ सामग्रीच्या प्रतिमुद्राधिकारधारकास श्रेयनिर्देशन करणे हेदेखील बंधनकारक होय.

  • बीज व फलित - ज्या धारिकेत आज्ञावली लिहिली जाते, तिला बीजधारिका असे म्हटले जाते. एखाद्या चालकासह चालवल्यास आज्ञावली नेमून दिलेले कार्य पूर्ण करते. अशा वेळी मिळणारी धारिका फलित म्हणून ओळखली जाते. ग्नू संस्थेचे परवाने व आलोक नित्यमुक्त परवाना हे आज्ञावलीय बीज मुक्तपणे देण्याची वितरित करण्याची सक्ती निर्मात्यावर/निर्मातीवर करतो.


कोणत्या सामग्रीस लागू?

आलोक नित्यमुक्त परवाना प्रतिमुद्राधिकारप्राप्त कोणत्याही सामग्रीस वापरला जाऊ शकतो, परंतु ते वितरण करताना सामग्रीची प्रतिमुद्रा कोणत्या स्वरूपातील आहे ह्यावरून तिची परवाना वापरण्यासाठीची अर्हता ठरते. संगणकबाह्य कोणतीही सामग्री आलोक नित्यमुक्त परवाना वापरू शकते. उदा. छापील लेखन, छापील छायाचित्रे, फिल्मवर आधारित चित्रपट अथवा छायाचित्रे, रिळावर आधारलेली ध्वनिमुद्रणे. ही व अशी संगणकबाह्य कोणतीही सामग्री आलोक नित्यमुक्त परवान्यासह वितरित केली गेली असेल, तर तिच्या पुनर्निर्मितीस व वितरणास निर्मात्याची/निर्मातीची परवानगी आहे असे मानण्यात येईल. अशा संगणकबाह्य सामग्रीचे संगणकीकृत वितरण करावयाची परवावगी ह्या परवान्यासह आपसूक मिळत असली तरीही कोणत्याही स्वरूपाचे पुनर्वितरण एखाद्या नित्यमुक्त परवान्यासह करण्याची अट आहेच व आलोक नित्यमुक्त परवानाच वापरण्याची इच्छा असेल, तर संगणकबाह्य मुक्त सामग्रीचे संगणकीकरण करताना पुढील मुद्द्यांची काळजी घेण्यात यावी.

आलोक नित्यमुक्त परवान्यासह संगणकीकृत सामग्रीचे वितरण करावयाचे असल्यास पुढील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

  • सामग्रीची निर्मिती मुक्त आज्ञावलीचा वापर करून झालेली असावी.
  • फलित सामग्रीचे आज्ञावलीय बीज कुठे पाहता येईल ह्याचा स्पष्ट निर्देश सामग्रीतच केलेला असावा.
  • संगणकीय आज्ञावलीचे बीजदेखील एका नित्यमुक्त परवान्यासह वितरित केलेले असावे.

उदा. एखादा लेखी दस्तऐवज जर पीडीएफ् स्वरूपात वितरित करावयाचा असेल, तर त्याची निर्मिती करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्ड/इन-डिझाईन/ॲडॉब अशा अमुक्त आज्ञावल्या वापरू नयेत. अमुक्त आज्ञावल्यांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या संगणकीकृत सामग्रीचे वितरण आलोक मुक्त परवान्यासह करता येणार नाही. संगणकीकृत सामग्रीचे वितरण करताना जर तिच्या सार्वत्रिक आज्ञावलीय बीजाचा निर्देश केला गेला नसेल व सामग्री अमुक्त आज्ञावल्यांचा वापर करून घडवण्यात आली असेल, तर त्या सामग्रीचा परवाना अवैध ठरवण्याचे अधिकार आलोक मराठी नियतकालिकाकडे आहेत.

विविध प्रकारची संगणकीय सामग्री व तिचे वितरण करण्यासाठी आम्ही शिफारस करत असलेले स्वरूप पुढीलप्रमाणे -

  • लेखी दस्तऐवज - युनिकोड प्रणाली, .txt, .tex, .dvi (टेक्-फलित), .pdf (आवृत्ती १.७+ आवश्यक, मुक्त आज्ञावलीच्या वापर होणे आवश्यक), .odf, .md, .html, .epub, .djvu, .csv
  • छायाचित्रे - .flif (उत्कृष्ट गुणवत्तेसाठी), .png, .svg, .jpeg
  • ध्वनिफीती - .flac (उत्कृष्ट गुणवत्तेसाठी), .ogg (कमी आकारमान व मध्यम गुणवत्तेसाठी)
  • ध्वनिचित्रफीती - .mkv, .webm

वर नोंदवलेले सामग्रीचे प्रकार व त्यांचे स्वरूप ही एक सर्वसमावेशक यादी नसून, केवळ आमच्या काही शिफारसी आहेत. ह्याव्यतिरिक्त उपलब्ध असलेल्या मुक्त स्वरूपांसह संगणकावर वितरित होणारी सामग्री आलोक नित्यमुक्त परवाना वापरण्यास पात्र आहे. मुक्त स्वरूपांची आणखी तपशीलवार यादी पुढील दुव्यावर पाहता येऊ शकते.

https://en.wikipedia.org/wiki/List_of_open_formats

प्रतिमुद्राधिकारप्राप्त सामग्री संगणकीय आज्ञावलीच असेल तर ती मनुष्यास वाचनीय (द्विमान सामग्री मनुष्यास वाचनीय नसते) स्वरूपात महाजालावर उपलब्ध करून द्यावी. आज्ञावलीय बीज वितरित करण्यासाठी गिटहबऐवजी गिटलॅब ह्या मुक्त प्रणालीचा वापर करावा असे आम्ही सुचवू. ही एक अट नसून शिफारस आहे.


वितरणविषयक नियम

  • सर्वप्रथम सामग्रीच्या निर्मात्याने/निर्मातीने प्रतिमुद्राधिकार आपले असल्याचा स्पष्ट निर्देश करावा. तो करताना तारीख अथवा वर्ष स्पष्टपणे नमूद केलेले असावे. तत्पूर्वी प्रस्तुत सामग्रीची ही कितवी आवृत्ती आहे व कधी प्रकाशित होत आहे तेही नमूद करावे. प्रतिमुद्राधिकाराचा निर्देश पुढील प्रकारे करणे बंधनकारक आहे.

    <आवृत्तिक्रमांक>वी आवृत्ती <प्रकाशनाची तारीख>
    © <प्रकाशनवर्ष> <निर्मात्याचे/निर्मातीचे नाव>

  • ह्या मजकुराखाली पुढील परिच्छेद लिहिण्यात यावा.

    ह्या सामग्रीच्या वितरणाचे व प्रतिमुद्रणाचे अधिकार आलोक नित्यमुक्त परवान्यासह मुक्त करण्यात येत > आहेत. ह्या सामग्रीची यथामूल अथवा परिवर्तित प्रतिमुद्रणे व्यावसायिक अथवा अव्यावसायिक स्वरूपात वितरित करण्यास प्रतिमुद्राधिकारधारक संमती देत आहे, परंतु असे करताना वितरकाने प्रतिमुद्राधिकारांचा योग्य श्रेयनिर्देश करणे व सामग्री परिवर्तित असल्यास ती ह्याच अटींसह वितरित करणे बंधनकारक आहे. ही सामग्री जशी आहे तशी पुरवण्यात येत आहे, पुरवणारा/पुरवणारी हिच्याबाबत कोणतीही हमी देत नाही. ह्या (व ह्यावर आधारित) सामग्रीचे अमुक्त वितरण बेकायदेशीर मानले जाईल. आलोक नित्यमुक्त परवान्याचा संपूर्ण मसुदा पुढील दुव्यावर वाचता येईल.

    https://varnamudra.com/aalok/nityamukta-parwana/


सामग्रीचे पुनर्वितरण कसे करावे?

  • ह्या परवान्यासह वितरित होणाऱ्या सामग्रीच्या परिवर्तित स्वरूपाचे वितरण करायचे असेल, तर मूळ सामग्रीच्या प्रतिमुद्राधिकारधारकास त्याचे श्रेय पुढीलप्रमाणे द्यावे व त्याखाली नव्या निर्मात्याने/निर्मातीने प्रतिमुद्राधिकार स्वतःकडे घ्यावेत. उदा.

    मूळ सामग्री - <सामग्रीचे नाव>
    निर्माता/निर्माती - <निर्माता/निर्मातीचे नाव>
    निर्मितीवर्ष - <मूळ सामग्रीच्या निर्मितीचे वर्ष>

    आधारित/परिवर्तित सामग्री
    <आवृत्तिक्रमांक>वी आवृत्ती <प्रकाशनाची तारीख>
    © <प्रकाशनवर्ष> <निर्मात्याचे/निर्मातीचे नाव>

  • एखादी सामग्री प्रकाशित झाली तेव्हा मुक्त नसेल, परंतु प्रतिमुद्राधिकारधारकास तिचे नित्यमुक्त वितरण करण्याची इच्छा असेल, तर त्याने/तिने नित्यमुक्त परवान्यासह त्या सामग्रीची सुधारित आवृत्ती प्रकाशित करावी. एखादी प्रकाशित अमुक्त सामग्री आलोक नित्यमुक्त परवान्यासह मुक्त माध्यमांवर प्रकाशित करायची असेल, तरीही त्या सामग्रीच्या प्रतिमुद्राधिकारधारकाशी संपर्क साधून, त्यांची लेखी परवानगी घेऊन, हा परवाना वापरता येईल. असे करतानादेखील प्रतिमुद्राधिकार मूळ निर्मात्या/निर्मातीकडेच राहतील.


अनुरूप परवाने

आलोक नित्यमुक्त परवान्यास केवळ ग्नू फ्री डॉक्युमेन्टेशन परवाना व ग्नू संस्थेचा जनरल पब्लिक परवाना हे दोन परवानेच अनुरूप आहेत. क्रिएटिव्ह कॉमन्सचे परवाने संगणकीय पुनर्वितरणाच्या वेळी अमुक्त आज्ञावल्यांना प्रतिबंध करत नाहीत, शिवाय आज्ञावलीय बीज देण्याची सक्तीदेखील करत नाहीत, त्यामुळे सामग्रीची परिवर्तनशीलता कमी होते व सामग्रीची मुक्तता घटते, त्यामुळे क्रिएटिव्ह कॉमन्सचे परवाने आलोकच्या परिवर्तित सामग्रीकरिता वापरू नयेत. अन्य कोणताही असा परवाना ज्यात आज्ञावलीच्या मुक्ततेचा विचार केला जातो व प्रतधारकाच्या सुरक्षेचा व स्वातंत्र्याचा विचार केला जातो, त्या परवान्याचा समावेश अनुरूप परवान्यांमध्ये करता येईल. असा कोणताही परवाना आढळल्यास आलोकच्या गिट-पृष्ठावर सुधारणांमध्ये तसे नोंदवावे. त्या परवान्याचा ह्या यादीत समावेश केला जाईल. परंतु (पहिल्या आवृत्तीनुसार) केवळ हे दोन परवानेच आलोक परवान्याकरिता अनुरूप मानले गेले आहेत.